बुधवार, १२ जुलै, २०२३

पक्षफुटी,सदू आणि बंडयापाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

 सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

"अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

"जबर हादरा ?"

हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

"दादानं...कोण्चा दादा....?"

"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

"ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

"हाबडा? कुणाला.??"

"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

" इक्कास."

" इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

"खरं,हे खरं नसतं?"

"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

"इक्कास..?कोण्चा?'

"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

"सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

"ते कसं?"

"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

सोमवार, १९ जून, २०२३

इंग्लिशस्कूलचं फॅड

 गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!

गुरुवार, १ जून, २०२३

जगण्याचा आराखडा
जगण्याचा आराखडा

आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं.

पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.

    ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.

  कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या हातात असतात दो-या  त्याच्या बोटावर  नाचतात बाहूल्या.कुणी आपलं हसू चोरतं.कुणी आपला राग वाढवत.कुणी आपल्या इर्षा पेटवत.कुणी तरी त्याचं रडगाणे ऐकून आपलं डोळं ओलं करतं.नीट विचार करा. हे परावलंब मान्य होतंच ना  आपल्याला ? राग,दृवेष व आनंद  या भावना कुणी तरी नक्की   नियंत्रित करत असते.जगण्याचा आराखडा आपला हवा. दु:ख आणि सुख हि आपलंच हवं ना ? त्यासाठी आपला स्वतःचा जगण्याचा आराखडा हवा.आपली आणि फक्त आपली स्टाईल हवी,नाही का?

      परशुराम सोंडगे,बीड

शुक्रवार, १२ मे, २०२३

सज्जनतेचा आव आणि दुर्जनांचा डाव

दुर्जनाचा विजय असो.या जगात सज्जन आणि दुर्जन अशी दोनच प्रकारची माणसं राहतात.सज्जनचा सदैव दुर्जनाशी संघर्ष असतो.प्रत्येकाला आपण सज्जनच असावं असं वाटतं.दुर्जन तर कुणालाच व्हायचं नसतं.उलट आपण दुष्टं किंवा दुर्जन असू नाही किंवा तसं कुणी समजू नाही असा प्रत्येकाचा अटृटाहास असतो.आपल्या  दुर्जनत्वाचं प्रदर्शन करावं असं कुणालाचं वाटतं नाही.दुर्जनत्व लपवून ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न माणूस करत असतो. त्यामुळे सज्जन असण्याचा  आवं चेह-यावर पसरून माणसं वावरत असतात. 

आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी  जशी माणसं झगडतात तशीच आपण किती सज्जन आहोत याचा ही 'शो ' माणसं जिथं तिथं करतच असतात.अनेकदा सज्जनतेचे सोहळे साजरे होताना आपण पहातोच असतो.

 सुगंध जसा शपथ घेऊन सांगावा लागतं नाही.तो आपोआपच जाहिर होत असतो.तसंच दुर्गंध दडवून नाही ठेवता येत.तो कुणालाच हवा नसतो पण तो बाहेर पसरतोचं. अनेकदा आपल्याला दुर्गंध सहनच करावा लागतो.आपण सज्जन असावा असं वाटणं व किंवा तसा आव आणणं आपण समजू शकतो.कुणी सज्जन असू नाही किंवा

कुणी अधिक सज्जन होत असेल अथवा तसा कुणी प्रयत्न करत असेल तर काही लोकांना रूचत नाही.त्याला दुर्जन ठरवण्याचा काही लोक चंगच बांधत असतात.त्याचं दुष्टत्व  ढोल वाजवून सांगितलं जातं.

सहसा कुणी कुणाच्या  सज्जनतेचा स्विकार करत नाही. त्यामुळेच अनेक साधू संतांना पिडा देण्यात हे जग पुढे आहे.इतिहास अश्या संघर्षाच्या  कथाच तर असतात.सज्जनतेचा विजय होतो असा इतिहास सदैव सांगतो.कथा ,कांदब-या, चित्रपटातून ही  सज्जनतेचा विजय होतो असंचं दाखवतात. प्रत्येकाला तेच तर  हवं असतं.

 प्रत्येकालाचं सज्जनच व्हायचं असून ही दुर्जनांची संख्या या जगात का जास्त आहे?असा प्रश्न  तुम्हाला ही पडलाचं आसेल.वास्तव तसं असतं नाही.या जगात सज्जनांची संख्या जास्तच आहे.दुस-याचं सज्जनत्व स्विकारणं बहुतेक लोकांना जमतंचं असं नाही.

  दुस-याला सज्जन समजणं  हे पण सज्जन असण्याचं  मुख्य लक्षण आहे.तुम्हाला कुणी सज्जन समजत नसले तरी आपण प्रत्येकाला सज्जन समजणं आवश्यक आहे.दुष्टांना पण इज्जत देणं सोपं नाही पण सज्जनांची संख्या वाढवण्यासाठी आज पासून आपण ते सुरू करू.मग ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

     ||Youtuber||Blogger||

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...