मोगरा फुलला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोगरा फुलला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ जुलै, २०२३

लफडीचं पण राजकीय पक्षांची....


पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात

कसे  ?

रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता.

तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती. 

काय करावं हे त्याला कळतं नव्हतं.

पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.

    जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इतकं खालचं राजकारण कसं करायचं?सरडा तर फक्त रंग बदलतो.आपले नेते तर रंग,बोलणं,वागणं ,विचार सारचं बदलतात.(विचारांचा राजकीय नेत्यांचा कित्ती कसा संबंध असतो?) आपल्या नेत्या इतकं व तसं बदलणं त्याला  सोपं नव्हतं वाटतं.

ज्यांना शिव्या दिल्या,ज्यांची बॅनर फाडली.त्यांच्यासोबत आपण कसं  राहायचं? आन कॅमेरा त्यांना मिठया कश्या मारायच्या? त्यांच्या आरत्या कश्या करायच्या? स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?

 सत्तेसाठी ते पण करू पण लोक काय म्हणतील याची त्याला भीती नाही पण लाज वाटतं होती. उगीचंच जामं टेन्शन आलं गडयाला.


           त्यावेळी त्याला तो दुदैवी उनाड  संत्या आठवला.संत्याची आय दुस-यासंग पळून गेली होती  पण त्याची आय संत्याचा फार लाड करी पण त्याला आईला बोलूसंधंधं वाटतं नसं.आय कुणा बरं गेली तरी त्याला आपला बाप नाही म्हणता येतं.संत्याचं गहिरं दु:ख त्यांच्या मनात दाटून आलं.त्यानं स्टेट्स सोडलं.

आय कुठं गेली तरी बाप हा बापचं असतो. 

विन्या.म्हणजे विनोद पाटील एका आमदारांचा उजवा हातच.

याचा पक्ष फुटला नाही पण दुसरा पक्ष फुटून त्याच पक्षांबरोबर  एका गटानं युती केली आणि एकदाची यांच्या पक्षाची बहुप्रतीक्षित ौसत्ता आली. सत्ता आली कोण आनंद झाला ?

यानी फटाके वाजवले.डीजे लावून चौकात नाचला.भरपूर प्याला.गुलालात टिरी बडवून सर्व लाल करून घेतल्या.

राजकरणात निष्ठेला आणि तत्वाला फार महत्व असतं.गद्दारांना आपल्या पक्षात क्षमा नाही.त्याच्या नेत्यांची भाषणं त्यांनं  ऐकली.त्याचं ऊरं अभिमानाने भरून आलं. आपण गद्दार नाहीत हे तर त्याला कळलं.आपण घेणारे नाहीत देणारे आहेतं.आपण पद वाटायची. असं त्याचा नेता सारखं सांगायचा.त्याला ते पटतं ही असं.

काही दिवसांनी आपला घास दुसरं कुणीतरी खात आहे असं त्याला वाटाया लागलं.

ज्यांची बॅनर फाडली. शिव्या घातल्या त्यांच्याचं आता अभिनंदन करावं लागे.डिपी ठेवल्या,स्टेटस सोडलय.खंबीर साथ म्हणून....कॅप्शन पण लिहिले....सारं कौतुकं केलं.दुसरेचं कार्यकर्ते मलिदा खात होते. हा नुसता पहात होता.

सरकार त्याचं असलं तरी त्याला कुठं काय होतं? 

त्याला प्रियाची सावत्र आई आठवली. ती सारं काम प्रियाकडून करून घेते पण खायला पुरेसं देतं नाही.दिलं तरी शिळं पाकं खावं लागतं. तिचा लाड  कुणीचं करतं नाही.आई नाही आणि बाप ही नाही.

आई बाप आपलेचं असतात पण  सावत्र आई असली की परकेपणा आलाचं.सख्खा बाप ही फारसा वाट्याला येत नाही.प्रियाच्या भावना याच्या डोळ्यातुन वाहू लागल्या.राम जगदाळे एका आमदाराचा जवळचा कार्यकर्ता.त्याचं पक्ष फुटला नाही पण पक्षात मात्र माणसात माणूस राहिलं नाही.काही माणसांना लाडीगोडी लावून... थोडक्यात फूस लावून फितवलं आहे. सत्तेचा लाॅली पाप चघळता यावा म्हणून हे पण मितले आहेत. डायरेक्ट. सत्ता भेटल्यामुळे तो  ही खूश..त्याचा स्वभाव शिव्या घालायचा  नाही.मलिदयाची वाटी भी त्याच्या चांगली वाटयाला येऊ लागली आहे.तो खुशीत गाजरं खातो आहे.त्याला लाज फारसी वाटतं नाही पण संकोच वाटतो आहे. माणसाचं मनचं माणसाच्या जीवाला खाते.

त्याला सुमंत आठवला. सुमंतची आय एकाचं घर निघाली म्हणजे तशीचं घरात शिरलीयं.लोकं दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.ती कुजबुज याला नकोशी वाटते पण तो काहीचं करू शकतं नाही. 

  कोणं म्हणतं पक्षाची युती किंवा आघाडी होते? अलीकडं पक्षांची लफडी आणि अफेअर पण होऊ लागली आहेत. खरं ना?

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

नशिबाचे रडगाणं माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.

              नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ?

तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवून ठेवलेला असत़ो.भविष्यकाळ आपल्याला कळतं नाही.तिन्ही काळाच ज्ञान असलेला फक्त एकचं देव आहे.सर्वज्ञ भगवान परमात्मा.

  योगायोग तर माणसाच्या आयुष्यात घडतं असतात.कर्मधर्मसंयोग म्हणजे तर नशिबचं असतं,ना? नशिब म्हणा किंवा योगायोग म्हणा जे घडतं असतं ते  आपल्या हातात नसतं.

                 आता ,बघा ना, पाऊसाचे थेंब आकाशातून पडत राहतात.काही गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांवर पडतात.कोवळया उन्हात फुलांच्या कुशीत हसतं राहतात.कुणी चातकाच्या चोचीत पडतात. त्याला तृप्त करतात.कुणी तप्त मातीची तहान भागवतात.कुणी हागणदारीत पडतात.कुणी शिंपल्यात पडून मोती होतात.

        तसचं फुलांचं पण आहे.कुणी देवाच्या पायी,कुणी प्रेताच्या अंगावर ,कुणी एखादं सुंदरीच्या केसात गजरा होऊन हसणं राहतं.एखादंला हाव-या माणसाच्या शेंबड्या नाकात ही हुंगलं जावं लागतं.

आपण कसे वापरले जावं हे काही फुलांच्या  हाती नसतं.नशिबवान कुत्री मर्सिडीज गाडीतून फिरताना पाहिलीच असतील.दारोदार हिंडणारी कुत्री आणि माणसं ही असतातच की.योगायोग म्हणा किंवा नशिब म्हणा.हे घडतं असतं.अनेक मूर्ख चांगल्या खूर्च्या बळकावतात. तसेच अनेक तज्ञ खितपत पडतात.दोन घासासाठी अपार कष्ट करावं लागतं.ताटला लाथ मारणारी माणसं आहेत. चव भुकेत असते. अन्नात नाही. काहीचं गोड न लागणारी माणसं ही असतातच की.


अनेक गोष्टीला आपण व्यवस्थेला दोष देत राहतो. रेल्वेचा अपघात झाला रेल्वे प्रशासन आपल्या ऐरणीवर असतं.संसार नीट चालत नाही आपला डायरेक्ट विवाह संस्थेवरच आक्रमण असतं.लफडी झाली तरी आपण पोर्न साईटवर बंदी आणण्याची मागणी करतो.पूर्वी हे सारी खापरं आपण नशिबाच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचो.नशिबाच्या नाववर अनेक अपयश पचवायची सवय आहे माणसाला.अर्थात यशाचं श्रेयं हे माणस स्वतः च्या प्रयत्नाला देतात. दुस-याचं यशाचं श्रेय आपण नशिबाला देत असतो.नशिब माणसाच्या सोबतीला कायम राहिलेले आहे.निर्माता कायम या जगात विषमतेचे बीज पेरत आला आहे.वर्ण,लिंग ,शरीर, प्रदेश, बुध्दी, सौंदर्य अश्या अनेक बाबतीत माणसा मध्ये भेद केले आहेत.नशेत पबमध्ये नाचणारी धुंद माणसं आणि दोन घासांसाठी तडफडणारे माणसं याच जगात राहतात. माणसं समतेची हाक देतात पण सर्वत्र विषमतेचे राज्य आहे.

ठेवीले अंनते तैसेचि राहवे|चि

त्ती असू द्यावे् समाधान||हा अभंग पाठ करून ठेवला की दु:खात ही आनंद शोधण्याचं बळ येतं. सा-याचं गोष्टी नशिबाच्या हवाली करतात माणसं.प्रयत्न संपलं की नशिबच येत पुढे.ते ब-याचदा सोयीचं असतं.

प्रयत्न असेल किंवा नशिब असेल,योगायोग असेल चित्त समाधानी ठेवा असा सल्ला तुकोबांचा आहे.कर्मवादावर व प्रयत्नवादावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा चित्ताचं समाधान महत्वाचं आहे.हे सोप काम नाही.

चित्ती समाधान....एकचं ध्येय.

सुप्रभात

     परशुराम सोंडगे

   ||Youtuber|| Blogger||़

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

लता दीदी,मी आणि माझी आई

 लता दीदी ,मी आणि माझी आई.

-----------------------------------------------------------------------------         


लता दीदी गेल्या.त्यांची नि माझी कधी भेट झाली नाही.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य वाटयाला कधी आलं नाही. त्यांची गाणी ऐकली. त्या सुरांनी व  शब्दांनी  मनात एक जागा केली. त्या दिव्य सुराबरोबरचं त्या व्यक्तीमत्वांनी  माझ्या काळजात घर केलं.
                     त्यांची गाणी ऐकत कधी धूंद झालो.कधी चेकाळलो.कधी विरघळून गेलो.कधी रडलो. त्या माझ्या कुणीचं नव्हत्या.माझ्या आईला व आण्णांना तर त्या अजिबात माहित नव्हत्या. आईचं विचाराल तर  राष्ट्रीय दुखवटा जाहिर झाला तरी आईला त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. लता दीदी हे जग सोडून गेल्या ही बातमी पण तिला कळली नव्हती.आई शिकली नाही.तिला लता दीदीचं नाव माहित नाही.मी श्रध्दांजली म्हणून लता दीदीचं 'अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव |दरीदरींतून मावळ देवा देऊळ सोडून धाव | ' हे गाणे युटूबवर लावलं.आईला ऐकवलं.
       काही क्षण मी निशब्द झालो. तिला ते गाणे फार आवडले. ते गाणं आईला कितीकसं कळलं असेल हा एक प्रश्नचं आहेपण ते स्वर तिच्या ह्रदयाला भिडले असावेत.हे गाणं म्हणणारी  बाई आज मेली आहे एवढचं आईला कळलं.आई फार  भावूक झाली.गावात कुणी मेलं तरी आई त्या माणसाठी दोन अश्रू वाहते. तिचं डोळ भरून आलं. जन्मला आलं की मराणं आलचं. मरून जाण्यासाठी का देव माणसाला जन्म घालत असेल? तिला भाबडा पण हा गहन प्रश्न पडला.
               लता दीदीला आम्ही नात्याचं लेबल नाही चिटकवू  शकत पण त्या माझ्यासाठी स्पेशल होत्या. आपलं आणि फक्त  आपलचं असतं ना कुणी.अगदी तश्या. त्या भारताच्या कोकिळा होत्या.माझ्या देशाची शान होत्या.त्या भारताचं रत्न होत्या .खरं खोटं माहित नाही पण पाकिस्तानचा मला  तेव्हा पासून फार राग येतो. 
             मी लहान असतानी अशीचं एक कुणीतरी पुडी सोडून दिलेली होती.ती पुडी अशी होती की  काश्मिरच्या बदल्यात पाकडे  लतादीदीचा गळा मागत आहेत.राग ही आला आणि भिती ही वाटली.सरकार दीदीचा गळा पाकडयांना देणार तर नाहीना? हया कल्पनेनचं काळजात धस्स झालं होतं. एकवेळ भारत काश्मिर पाकडयांना देईल पण लता दीदिचा गळा नाही दयायचं सरकार असं कधी वाटायचं.
 त्यांच्या जादुई गळयाचं संशोधन जगातील शास्रज्ञ करत आहेत.त्तांधा लता दीदी सारखा गळा तयार करायचा आहे.अशी पण एक पुडी सोडली होती काही दिवस. माझ्या प्रियेशीचा आवाज लता दीदी सारखा असावा असं मला माझ्या पहिल्या प्रेमापासून वाटतं आलं आहे. त्यामुळे मला दिदीनं गायलेली प्रेमगीत, शृंगार गीत खूप आवडतात आज ही.ती आवडतचं राहतील.
     संगीतातला मी फार जाणकार नाही. संगीताचा गाढा अभ्यासक तर मुळीच नाही. त्यांनी किती गाणी गायली? कसली गाणी गायली?त्यांची संपत्ती किती? त्यांनी कोणत्या प्रकारची गाणी गायली नाहीत?त्या अविवाहीत का राहिल्या? त्या गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीच काय करतील? असले सुजाण नागरीकाचे प्रश्न मला कधी पडले नाहीत. त्यांच्या सुरांचं नि माझ नातं आहे. त्या देहानं पंचतत्वात विलीन झाल्या अस्ल्या तरी सूर तर अजून ही मनात अमृताचे  शिंपन करणारच आहेत ना?त्या अमर नसतील पण त्यांचे स्वर तर अमर आहेत ना?

लता दीदींना मी का श्रध्दांजली वाहू? त्या त्यांच्या स्वराच्या रूपात माझ्या मनात सदैव घुमत राहणार आहेत.

     परशुराम सोंडगे,पाटोदा.

मंगळवार, १५ जून, २०२१

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं


 रिमझिम गिरे सावन.......

पाऊस आणि आठवणींच मेतकूटं

पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.

    पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.


शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

कुणात जीव रंगला

कुणात
जी
व रंगलापरवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो. सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती. आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं . लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ... दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं. माझ्या एटीएमचा ताबा त्यांनी कधीच घेतला होता. मी आपलं उग इकडं तिकडं पहात होतो काय करणार? समोरच्या एका कांऊटरवर मला एक मुलगी दिसली. ती सेल्स गर्लच होती. या दुकानात दोनशे तीनशे तरी वर्कर असतील. त्यात ती नवखी वाटत होती .थोडी आर्कषक होती. अगदीचं मोहक वगैरे नाही. बाकीचं पण अनेक मुली मुलं होती.काही प्रौढ ही होती पण ती जरा वेगळीच वाटतं होती. ती तन्मयतेने काम करतं होती. ग्राहकाला तत्पर सेवा देत होती. तिचं बोलणं शांत होतं.ते ब-यापैकी मधूर असावं.मला तर ती प्रमाणिक वाटतं होती.मी तिच्याकडं वांरवार पहातो आहे हे तिच्या लक्षात आलं. तिच्या चेह-यावर संकोचाची रेषा उमटली. मी आता तिच्याकडं पहाणं टाळल. आता चोरून वगैरे पहाणं तर योग्य नव्हतं. मी आपलं वेडयाचं सोंग....घेऊन इकडे तिकडे पहात बसलो. तिच्या बरोबरची पोरं होती.ते चांगलेचं चेकाळली होती.ते तरूणचं होती.आणि त्यांच्या त्या हरकती तारूण्य सुलभचं होत्या.पण ती त्यातली नव्हती. ती शांत होती.मला जरा सोज्वळ वाटली . उलट ती तो धिंगाणा..मस्ती टाळत होती . मला पण एक कळत नव्हतं.माझं लक्ष तिच्याकडंचं का जातं होतं? काहीचं कारणं नसतानी नजरानजर होई. तो अपघातचं असे. तशी ती जास्त संकूचली.... थोडया वेळात एक प्रौढ बाई आली. तिच्या हातात एक वायरची पिशवी होती. ती जरा थबकत थबकत चलत होती. तिचं कुणीतरी हरवलं असेल का ? ती कुणाला शोधत होती? तिनं तिथंचं जवळ एका मुलाला विचारलं," आरं तू इथचं कामाला आसतुस काय ?" "हा..काय घ्यायचं ?" त्या पोरांनी जरा तिरकसचं प्रश्न केला. "घ्यायचं नाही.मला दयायचं .." " दयायचं.....? इथं काय द्यायचं ?इथं फक्त ..दिलं जातं." " आर, आमची आशी हाय कामाला इथं . दिसली का तुला ?" "आशी....कदमाची का चाळकाची ? " चाळकाची ...मयी पोरगी हाय ती"ते पोट्ट तिथूनच आरडलं. "ऐआश्ये....इकडं बगय तुही आय आली." आता त्याचा आवाज ऐकून सारीचं माणसं भांबरली. त्या बाईकडं पाहू लागली. आता हयो काय गुन्हा केलाय आपणं .आस तिला वाटलं. ती वरमलीचं. सारेच टकमक तिच्याकडं पाहू लागली.ती तरा तरा चालत त्या आशीकडं गेली. आशीला मात्र हे आवडलं नव्हतं. तिचा परावर चढला होता. चढलेला पारा चेह-यावर कुठं झाकत असतो व्हयं ? आशी राग रागच पहात होती. ती जवळ गेल्या गेल्याच आशी म्हणाली," कशाला आल्लीस ग इथं ?" " कशाला म्हंजी.....? तू भाकरीचं गठूड तसचं इसरून आल्लीसा. मग दिवस भर काय खाशीलं?" " तेवढयासाठीच आल्लीस व्हयं ?" " हा...कुठून आणून खर्ची?ते पाटलाचं टॅम्पो आल्लाय बाया घेऊन. " "बाया कशाला ?" " त्या मळयात नाही का पल्ली दिल्ली.तिच्यात ज्वारी काढायची." " मोलाणी आणल्यात वयं ?" " मग... बायाचं मिळाणातं ...तीनशं रूपयं रोजं केलाय त्यांनी. इक्काश्या भी लयं माग लागला व्हता. आपल्याला काय ? टेंप्पूत बसायचं. जायचं. ती लखा आत्या म्हणत होती.आश्यीला.... उगचं दुकानावरं पाठीलसं. चार हजारात काय होतं? बाहेरं असं दहा दिसं जरी काम भेटलं तरी झालं. उग कशाला महिनाभर टल्ल खात बसायचं?" " गप्प भर तू...? जा..आता " " म्या जाते.... हे घे. यात आळुच्या वडयात...दिल्लत साखर मावशीनं पानं ते केल्यात. खा लगीचं ?" " म्या खाल्लयं थोडं ? " " आता काय खाल्लसा ?" " खाल्ला वडा पाव... आणला होते " " कुणी....? कोण्या पोराबिरांनी आणलेलं खाऊ नक्कू... ? पोरं लयं टुकार निघाल्लीत आत्ताची." " आये..जा बरं तू...: तिचा काय पाय ओढत नव्हता. तिला अजून काहीतरी बोलायचं होतं. ती मागं फिरल्याली वरळून आली.तिला पालून घेतलं.आश्यी येतं नव्हती.एकदाची ती कटून लावावी म्हणून आली. "आये...जा भर त् आमचं शेठ बघत्या. गि-हाईक पण आढून बसलेत.लयं खडूस हाय हयो लहाना सेठ " " म्हणूचं म्हणत्ये? आसलं कामचं नक्कू बाई. आसल्याच्या नजरा लयं वाईट आसत्यात. " " आग तसलं नाही ग ? " " याचं दुकानातली पोरगी पळून गेल्लती गेल्या वर्षी...तेव्ह टॅप्पूवाला दत्या म्हणत व्हता." आता या दोघी बोलतं बसलूयावर...तिथं सारा खोळंबाचं झाला. तिकडं ते दोनं पोरं...आणि एक पोरगी कानात कुजबजत यांच्याकडं पाहून हासत व्हती. आशीला कसं तरीचं झालं. तिला रागचं आला आयीचा . " त्या दत्याचं नक्कू सांगूस लय नाय शहाणा.... तसली का मी ?" " तसं नाय ग चिमणे...पण उग केलं कुणी काठीचं कोल्हं तर ? हाय का कुणी आपल्याला गरीबाला...?" आशीचं आय पार काकुळती आल्लती तिचं ही खोटं नव्हतं. जगात काय म्हणून घडतं नाही. " आज घरी येणारं मी. मग ठरू.आत्ताचं कमून डोक्कं खाती?" "तसं नाय पण ....जीवाला घोरं लागुतीये..." ती पुन्हा जवळ गेली. तिच्या डोक्यावरून हात फिरीला. बोटं कडाकडा मोडली. " येते मी. दत्या नुसता काव्हणं.उशीर केल्यामुळे...राग नक्कू येऊ देऊस..माझे चिमणे,.. पण दिवसचं खराब आल्लेत बग. पोरांनी काही दिल्लं तर घेऊ नक्कू. आपलं फटकूनचं वाग...काहीचं आसत्यात तसल्या पण गव्हा बरूबर किडं भी रगडत्यात." ती तरा तरा चालायला लागली. दोन तीन पाय-या उतरल्यावर...तिथूनचं ओरडली. " आश्ये ..! भाकरी मोकळया करून ठेव.नाय तर त्यावरलं बेसणं खराब होईल." आशीनं पुन्हा तिच्याकडं बघितलं. ती वायरची पिशवी कांऊटरच्या खाली मांडली. ती पण गुपचूप.... हे सारं मी पहात आहे. तिच्या लक्षात आलं. ती अजून वरमली. तिनं मानं खाली घातली ते वरचं केली नाही. आता पुन्हा ती माझ्याकडं पहात नव्हती. तसं तिनं ठरवलचं असावं. थोडावेळ झाला.
.
 सौ. आणि श्रुति आल्या. त्यांना आता त्याचं कांऊटरला खरेदी करायची होती. जिथं ही अशा होती . त्या दोघी पुढं सरकल्या तसा मी ही सरकलो.त्यांची खरेदी सुरू झाली. तिला एखादी साडी पंसत होणं सोप काम नाही.सारे कंटाळणारं पण ती नाही कंटाळात.आशा त्यांना फार तत्परतेने सारं दाखवत होती. यांच्या स्टाईलला कमी नव्हती. ग्राहक हा राजा असतो.हे सौ.ला पक्कचं ठाऊक असतं. तिला तसचं फिलींग होतं. टाईमपास म्हणून...एक बडीशेपची पुडी तोडली. आणी रिकामा पाऊच कचराकुंडीत टाकायला गेलो. पहातो तर... तीचं वायरची पिशवी त्यात होती. मी खात्र करावी म्हणून ती उचलून पाहिली. तर भाकरीचं गठोड ही तसचं होतं. मी उचलली आणि तशीचं घेऊन आलो. आशा माझ्याकडं पहात होती. एकटक.... मला मात्र कळत नव्हतं. तिनं असं अन्न का फेकून दयावं ? तिला काय नाकारायचं होतं ? ते गरीबाचं अन्न....की तिच्या आईचं भाबड प्रेम ? वास्तव नाकारून ती कसल्या स्वप्न रंगात तर रंगली नव्हती ना ? का कुणात जीव रंगला असेल तिचा ... ?
               परशुराम सोंडगे,पाटोदा
        sahitygandha(साहित्यगंधा).blogspot com.            9673400928

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...