सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

लता दीदी,मी आणि माझी आई

 लता दीदी ,मी आणि माझी आई.

-----------------------------------------------------------------------------         


लता दीदी गेल्या.त्यांची नि माझी कधी भेट झाली नाही.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य वाटयाला कधी आलं नाही. त्यांची गाणी ऐकली. त्या सुरांनी व  शब्दांनी  मनात एक जागा केली. त्या दिव्य सुराबरोबरचं त्या व्यक्तीमत्वांनी  माझ्या काळजात घर केलं.
                     त्यांची गाणी ऐकत कधी धूंद झालो.कधी चेकाळलो.कधी विरघळून गेलो.कधी रडलो. त्या माझ्या कुणीचं नव्हत्या.माझ्या आईला व आण्णांना तर त्या अजिबात माहित नव्हत्या. आईचं विचाराल तर  राष्ट्रीय दुखवटा जाहिर झाला तरी आईला त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. लता दीदी हे जग सोडून गेल्या ही बातमी पण तिला कळली नव्हती.आई शिकली नाही.तिला लता दीदीचं नाव माहित नाही.मी श्रध्दांजली म्हणून लता दीदीचं 'अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव |दरीदरींतून मावळ देवा देऊळ सोडून धाव | ' हे गाणे युटूबवर लावलं.आईला ऐकवलं.
       काही क्षण मी निशब्द झालो. तिला ते गाणे फार आवडले. ते गाणं आईला कितीकसं कळलं असेल हा एक प्रश्नचं आहेपण ते स्वर तिच्या ह्रदयाला भिडले असावेत.हे गाणं म्हणणारी  बाई आज मेली आहे एवढचं आईला कळलं.आई फार  भावूक झाली.गावात कुणी मेलं तरी आई त्या माणसाठी दोन अश्रू वाहते. तिचं डोळ भरून आलं. जन्मला आलं की मराणं आलचं. मरून जाण्यासाठी का देव माणसाला जन्म घालत असेल? तिला भाबडा पण हा गहन प्रश्न पडला.
               लता दीदीला आम्ही नात्याचं लेबल नाही चिटकवू  शकत पण त्या माझ्यासाठी स्पेशल होत्या. आपलं आणि फक्त  आपलचं असतं ना कुणी.अगदी तश्या. त्या भारताच्या कोकिळा होत्या.माझ्या देशाची शान होत्या.त्या भारताचं रत्न होत्या .खरं खोटं माहित नाही पण पाकिस्तानचा मला  तेव्हा पासून फार राग येतो. 
             मी लहान असतानी अशीचं एक कुणीतरी पुडी सोडून दिलेली होती.ती पुडी अशी होती की  काश्मिरच्या बदल्यात पाकडे  लतादीदीचा गळा मागत आहेत.राग ही आला आणि भिती ही वाटली.सरकार दीदीचा गळा पाकडयांना देणार तर नाहीना? हया कल्पनेनचं काळजात धस्स झालं होतं. एकवेळ भारत काश्मिर पाकडयांना देईल पण लता दीदिचा गळा नाही दयायचं सरकार असं कधी वाटायचं.
 त्यांच्या जादुई गळयाचं संशोधन जगातील शास्रज्ञ करत आहेत.त्तांधा लता दीदी सारखा गळा तयार करायचा आहे.अशी पण एक पुडी सोडली होती काही दिवस. माझ्या प्रियेशीचा आवाज लता दीदी सारखा असावा असं मला माझ्या पहिल्या प्रेमापासून वाटतं आलं आहे. त्यामुळे मला दिदीनं गायलेली प्रेमगीत, शृंगार गीत खूप आवडतात आज ही.ती आवडतचं राहतील.
     संगीतातला मी फार जाणकार नाही. संगीताचा गाढा अभ्यासक तर मुळीच नाही. त्यांनी किती गाणी गायली? कसली गाणी गायली?त्यांची संपत्ती किती? त्यांनी कोणत्या प्रकारची गाणी गायली नाहीत?त्या अविवाहीत का राहिल्या? त्या गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीच काय करतील? असले सुजाण नागरीकाचे प्रश्न मला कधी पडले नाहीत. त्यांच्या सुरांचं नि माझ नातं आहे. त्या देहानं पंचतत्वात विलीन झाल्या अस्ल्या तरी सूर तर अजून ही मनात अमृताचे  शिंपन करणारच आहेत ना?त्या अमर नसतील पण त्यांचे स्वर तर अमर आहेत ना?

लता दीदींना मी का श्रध्दांजली वाहू? त्या त्यांच्या स्वराच्या रूपात माझ्या मनात सदैव घुमत राहणार आहेत.

     परशुराम सोंडगे,पाटोदा.

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...