रविवार, २४ मे, २०२०

पेढयांचे वझं


सांयकाळचं पाच वाजलं असत्याल. फटयावर  जाल्बा नि त्याचं पोरंग तुष-या आलं होतं. त्यांना इथून पुढं बीड गाठायचं होतं. दोघा जवळं भी निबार वझी होती.पिशव्या.बाजकी.म्हतारीनं काही बाही दिलेलं. संगी जालूची बायको नि भी नको नको म्हणून बरचसं वझं केल होतं.दाळी नी दुळीनं.माळवं.काही घरचं काही  दुस-याकडून आणलेलं.दोंघांनी वझी टाकली हूश्य केलं. जाल्बानं रूमालनं सारा घाम पुसला. हाटलात जाउन चौक्शी केली पाची एसटी गेली का तर? आताच गेली.पाचच मिनीटं झालं आसत्यालं.असं त्या हाटलत्लया पो-यानं सांगितलं.
आयला, आता पार काशी झाली.आता कसं जायाचं?” जाल्बाच्या उरावर मोठा दगड ठेवल्यासारखं झालं.माटकुणी खाली बसला.तांबाखूची पिसी काढली नि बसला चोळीत.तुषा-याला काही नव्हतं त्याचं.ते खुशीत होतं.बीडला जायाचं.तिथं राहयाचं.कॉलेजात जायचं.असली चांगली चांगली सपन त्याच्या भोवती नुसतं  फुलपाखरावाणी भिरभिरत होती.ते मनातील मनातचं गुंग झाला होतं.पाचच्या  एस टीनं जरी ते गेले असते तरी बीडात उतरायाला सहा सात वाजल्या आसत्या.आता तर कवा वाहनं मिळतं नि कवा नाही.काय अंदाज काढाता येईना? आलं की लगेच मिळेलं नाहीतर.कव्हरं भी बसावं लागलं मंगस मारी करतं.
                  आता काही झालं तरी जावा तर लागलचं.एकदाचं प्रश्न मिटून जाईल.जाल्बाला इथं मरायला सवड नाही.त्यानं ती आज सवड काढली होती.टायमला निघाला पायजे.रानात गेलं की हे करं ते कर. कवानुक टायम झाला ते कळालचं नाही.झाली काशी. हुकली गाडी.उशीर का हाईना पण गडी मूड मधी होता.भावाला भेटयाला चालला होता.त्याचा भाव नवनाथ.बीडात नोकरीला.त्याला भेटायला तातडींन जावं लागत होतं.त्याला कारण भी तसचं होतं.तुष-या आवंदा दहावीत होता. दहावीचा रिझल्टं लागल्यालं चारपाच दिवसं झालं होतं.त्याच्या ॲडमिशनचं पहावा लागणारं होतं.लयच उशीर झाल्यावर पुन्हा ॲडमिशनाची पंचायत व्हायची.तुषा-यानं नावं कमावलं होतं.गावाच्या साळात पहिला आला होता.दोन तीन दिसापासून त्याचं सत्कार नि भित्कार चालूच होतं.झेडपी मेंबर, सभापती ,आमदार सा-यांचा हसते त्याचा सत्कार झालं व्हतं.पोरांच सत्कार झाला की जाल्बाचं ऊर भरून यायचं.डोळं भी वलं व्हायचं.तुषा-याकडं तेव्हं नुसता कवतुकानं पाहयचा.मनातील मनातच खूश व्हायचा.पाय पाय पोरग शाळात गेलं नि नाव कमावलं. गावाचं कमावलं. शिरावाडीत आतापर्यंत दाहीला एवढं मार्कं घेतलं नव्हतं कुणीच.  
                             सारचं सांगत होतं पोटटचं लयं हुशार. सारं गावच पोराचं गुणगान गायला लागल्यावर जालूची भी छाताड जरा फुगून वर आलं.येणारच ना? भल्या भल्याच्या पोरापेक्षा जास्त मार्क पाडलं होतं.सारचं सर नवाजितं होतं.तुषा-या तर हवेतचं होता.पोरांचा पोरींचा नुसता खंडाच त्याच्या माग होता.दोन तीन दिवस झालं.पोरं कुणी लातुरला जाणरं, कुणी नगरला जाणरं.कुणी बीडाला तर कुणी पाटोदयाला.तर कुणी आपल्याचं सारसगावातचं राहणारं होतं.अकरावी बारावी सुरू केली त्यांच्या भी साळात आता.तुषा-या बीडलाच जाणारं होता.सा-यानंच ते गृहीत धरलं होतं.तुषा-याचा चुलता राहत होता बीडात. तेव्हं तिथचं राहणार ना? सारचं माणसं म्हणायची.जाल्बानं भी तसचं मनात धरलं होतं. नवनाथनं ते काय यगळ थोडचं होतं?
             शाम खोत होता.त्याच्य टाटासुमोत आला.त्याचं पोरंग निल्यानं होता बरोबर.खोत त्यांच्या गावचा राशन दुकानदार.-यापैकी तालेवार होता.
कुठ निघाल रं जाल्बा एवढया उशीरा?”
बीडला निघालोत.नवनाथनं बोलील.पेढं घेउन.
काय तुषार?पेढं घेऊन चुलत्याला.लयं हालाखीत शिकला बघ तुझा चुलता.बाप राब राबला म्हणून दिसं आलं हे तुमच्या घराला.”
 ते तर हायचं. नवनाथ भी चांगला शिकला. गरीबीची जाणीव ठेवली त्यांनी. तसं एवढं पोरंग शिकलं की झालं. असतं काय मनुश्य जन्मात.?”
शिकलं, शिकलं. तुषा-याची कातणचं सांगती. पुन्हा नवनाथ पाशी ठेवल्यावर तुला काही टेन्शनचं नाय. लयं सोसलं त्यानं भी. तुवा भी मोठा त्याग.”
तुम्ही भी लयं उशीर केला ?कुठं गेल्ता कायनु? जाल्बानं भेत भेचं हटकीलं.
लातुरला गेलो होतो. याचं ॲडमिशनचं पगावं म्हणलं.”
मग? पगितल का?”
बघू. असा नंबर लागलं असं नाही वाटतं. एक दोन टक्कं कमीचं पडलं.तुषा-याचा नंबर लागलं. त्याचं काय ठरीलं? लातुरला ठेवीता की बीडातचं.”
त्याचं म्या काय ठरीनार. नवनाथचं ठरीनं.म्हणूनचं चाललोत.”
त्याला काय अडचण.कुठं भी ॲडमिशनं मिळलं.तुषार नि नावचं कमवीलं तुझ.जाल्बा.कसं भी कर.पोरंग शिकवं.आता निल्याचा चा नंबर नाही लागणार तिथं पण दिलं पालक मंत्रयाचं पत्र.आमदार भी बोललेत.लाख भर रूपये भी कबूल केल्यात एक जणला.नंबर  तर निल्याचा लातुरलाचं लावणार. त्याला डॉक्टरच करणार.”  शामा खोतानं मनातलं सारचं खरं सांगून टाकलं.
तुमचं काय? काही भी करताल?”
आर, कमून काय वर नेतं का कुणी? पोंर शिकली की झालं.लयं लोक तडफडतेत.आपून अजून लयं माग आहेत. शिकक्षणासाठी घर केली लातुरला काही लोंकानी. दुसरं काही नाही बुवा पोरं शिकली पायजेत.“  
                    तेवढयात एसटी आली. लांबलेलं गप्पाचं -हाट संपल.संध्यकाळचं पारं आठ वाजलं होतं. नाक्यावर उतरला की अगोदर त्यानं कॉईन बॉक्सवर जाऊन नवनाथाला फोन लावला.
आर,म्या उतरलो नाक्यावर.”
मग जा की घरी. म्या जरा कामात हाये.सायबा बरोबर.जा घरी.येतो लवकरचं मी.”
आर, बरचंस वझं.बाचकीत दोन.पिशव्यात.पूजाला पाठव.स्कुटीवर नाय तर भैय्याला.”
आर, हा क्लास टायेम.रिक्षा कर नि जा.मी आलोच.” जाल्बानं रीक्षा वाल्यला इचारलं.ते नवीन माणसं पाहीली की काही भी बकत असतेत.तेवढयासाठीचं शंभरनं ऐंशी रूपये म्हणायाला लागले.थोडं हटकूण पाहीलं.
तुषा-या,रीक्षाचा नि आपला नाय मेळ बसायचा.त्यांनी वळखील आपली पोथी.”
दादा,आपल्याला सापडण ना घर? नाय तर हुकतोन बरं आपून.”
नाय. आर, पुरं ध्यानात माझ्या. म्या कसं चुकलं? आपून काय लोकाच्या घरी चाललोत थोडचं.मी लयं हुशार नाय तुझ्यासारखा पण कामापुरत नॉलेज हाय मला भी.” त्याच्याकडं पगत जाल्बा हासला.
दादा,असं कमून बोलता? वझं.चुकलं तर उग बेजारी व्हायची महणून म्हणलं मी.लांब आसलं ते इथून.”
लांब कशाचं?आता जाऊत.तू थांब. मी पेढं आणतो.”
पेढं हायीत की मोठयाईन दिलेतं.”
आर, ते साधं पेढंत.तसलं पेढं नाही आवडायचं त्यांना. पूजा दीदीला यश भैय्याला.चांगला भारीतला आणतो पेढं.” जाल्बा गेला भारीतला पाव किलो पेढा आणला. उचाल्ले बाचकं.पिशव्या दिल्या तुषा-याकडं.निघालं.
                 जाल्बा घरी पोहचला.तुषा-या अगोदरचं पोरात मिसळला होता.पूजा नि भैय्या दोघं ही घरचं होतं पण नवनाथनं नाही पाठवलं घ्यायला.जाल्बा ते फेल गेलं पण बोलता थोडचं येत होतं? आताची पोरं तरी कुठं आई बापाचं ऐकतेत.च्या पाणी झालं.जाल्बा गप होता वहीनी लवकर बाहेर आली नाही. बोलली नाही. जाल्बा कव्हरं गप बसणं? त्यानचं आपलं तोंड उचाकल.
आर,तुषा-या पेढं दे की काकूला त्यांना?”बोलत करण्यासाठी त्यांनी पेढयाच इश्य काढला.तुषा-या पळतचं आला. भारी पेढयाचा पुडा उघडीला.पेढं देऊ लागला.पल्लवी काकू भी बाहेर आली.तुषा-यानी पेढा दिला.
आर,तुषा-या,मार्कं लयं पाडलं.कॉफया बिफया तर नव्हत्यानं केल्या?”
नाय नाय.माझं पेपरात नाव छापून आलं.वाचलं आसलं ना?”तुषा-यानं लगबगीनं पेपर काढाला पिशवीतला.
पेपर राहू दे.वाचलं आसलं त्यांनी.पेपर काय नवीन त्यांना? रोज पेपर पडत असणं  इथ घरी.पाय पड काकूच्या.पाया पङ.”जाल्बानं तुषा-याकडं पाहत बोलला.वहीनीच्या त्वांडावर पार बारा वाजल्या होत्या.जाल्बा काय कळत नव्हत का?
मोठा हो लवकर.सारसगावचं आपलं केंद्र तसलं.लयं कॉफया चालतत्यात तिथ.खेडयाचं नव्वद टक्के म्हणजे शहरातल चाळीस टक्केच असत्यात.” आसलं कसलं गणित काकूच हे तुषा-याला कळलं  नव्हतं.आसल्या गणिताची उत्तर नाही पण पध्दती लगेच्या कळत्यात.कवतुक करायचं सोडून आसली गणित हे कमून सांगाया लागलेत हे? जाल्बाचं ऊर कुणी तरी कुरतडीत असं झालं. तुषा-या सा-याल्या पेढं देत होता.
                                    बाजक्यातलं एक एक वस्तू जाल्बा सोडून दाखवू लागला.दाळीदुळी.गावरानं तुप.लोणचं.जवस,तीळ,भगर,पापडया,शेंगा. शेवाया.कांदे.माळवं.वहीनी सारं घेत होती.पहात होती.
किती वझं आणलं हे? कशाला आणलयचं एवढं?”
आईच तर सारखचं टूमणंच होतं हे ने. ते ने. संगीनं भी जवस तीळ नि कारळयानं सारं वझंच केल.जाऊ दया.तुम्ही दाट येत नाय.आम्हला भी येणं होत नाय.”
मला वाटलं होतं आंब नि शेंगा घेउन येतालं सुटीत पण नाय आलात.उन्हाळयात तरी काय कामं असतं?”
उन्हाळयात तर लयं काम राहत्यात.तुला नाही कळायचं.कुणब्याची मरणं.”
मग आता कस आलाव?आवड असली  की सवड निघती माणसाला.” तिरपी  मान करून पल्लवी वहीनी बोलली. जाल्बा चाकाटून गेला. तिरकसं बोलणं काळजालागर पाडीत गेलं.
आज आलो.तुम्हला पेढे दयाला.तुषा-याला म्हणलं होतं जा एकटाचं पण गाबाड येत व्हयं एकट?”
लेकाचं भारी कवतुक?लगेच आलावं पेढं घेऊन.पूजा म्हणतं होती उन्हाळयाला जायचं गावाकडं.साधा फोन पण नाय केला.”
वहीनी असं कमून बोलतेस? तोडल्यावाणी.आपल्याचं घरी यायला कशाला फोन पायजे ग? म्या काय कुणी परका का? पूजा दीदी.चलं आता उदया कॉलेज उघडू स्तोवर.”
आता नको.माझा डान्सचं क्लास सुरू झालाय.” पूजानं लांबूनच गाल फुगील.
डान्सचं भी क्लास असतेत?”
असतेत की.बळ बळचं लावला.ते नव्हत ऐकत.असलं नाही पटतं त्यांना.फारच तगादा लावला होता तिनं.”
आपल्या सारख्याला काय करायचं डान्सं नि बिन्सं.” एवढयाचं शबदाचा पुजाला लयं राग आला.
तुमच्या पोरींना नका शिकू.माझं पप्पा शिकीतेत तर शिकू दया ना.तुम्हला काय करायचं?” पाय आपटीतचं ती रूममध्ये गेली. जाल्बा तोंडात मारल्यावाणी गप बसला.
अग,पूजा दीदी..?”
जाऊ दया.ती लयं गांधन माशी.तुम्ही हात धूवा नि बसा जेवायला.”
नवनाथ?”
ते कशाचं येतेत लवकर? आज संडे.ते बाहेरूनचं जेउन येतेल.पार्टी त्यांच्या कोणा मित्राची.”
                 पोंराना जेवायला वाढलं. जेवण झाले की लगेच पूजा व राहूल भैय्या  आपआपल्या रूममध्ये गेली.नवनाथ्नि तुषा-या दोघचं राहीलं हॉलमध्ये.टीव्ही पहातं बसलं.काय करतेल? एवढा मोठा टीव्ही.थेटरचं असल्यावाणी वाटतं होतं.सोफयवर टीव्ही पहाता पहाता तुषा-या गेला झोपी.
                                  दहा वाजता नवनाथ आला.नवनाथ संडे साजरा करूनच आला होता.असा सोफयावर पडला.वाटत  नसलं तरी नवनाथ इतका सुध्दीत नव्हता.आपण येणार हे माहीत असून नवनाथ पार्टीला गेला.बाहेरून जेऊन आला.किती दिवसांनी आपून भेटतोत.पहीलं असं नव्हता करत.गावाकडून येतो म्हणला की सटँन्डवरचं थांबायचा. मोटर सायकल घेउन.आता नवनाथ मोठा होत गेला.बंगला आला.टू व्हीलर जाऊन फोर व्हीलर आली.असं माणुस मोठं होतं गेलं की त्याची माया भी आटतं असलं का? खरतर जाल्बाला सारचं परक वाटू लागलं.नवनाथाच्या बंगल्यालाच्या वास्तुशंतीला आख्खा टेम्पो गावकडून भरून आणला होता.आम्ही बांधलं बीडात घर. बीडात घर बांधलं. याचं फार भूषण वाटतं होतं त्याला.ते घर आपल्याला आता उचलून फेकून तर देणार नाही ना बाहेर ? असंच त्याला वाटायला लागलं.
                   जाल्बानं आपलं दोन घास खाल्लं.वहीनी उठून बेडरूममध्ये नेला नवनाथ.जाल्बा नि तुषा-या तशीचं हॉलमध्ये आडवी झाली.घरात फक्त चार माणसं.प्रत्येकाची बेडरूम वेगळी.प्राव्हसी पायजे प्रत्येकाला.आपला सारा जनम गेला.आपल्या नाही भेटली ती प्राव्हसी.संगीला आपल्या असं प्राव्हीसी नाही भेटली.एवढी काय गरज असती त्या प्राव्हसीची?
                           सकाळी लवकरचं उठून तयार झालं.जाल्बा नि तुषार भी.नवनाथला भी ऑफीसला जायचं होतं. तेव्हं त्या गउबडीतचं उरकायला लागला.इकडचं तिकडंच सारं बोले.रातचं वहीनीच नवनाथचं बोलणं ऐकलं होतं जाल्बानं.नवनथ आता बायकोच्या मुठीत गेला. म्हणलाय सायब राहीला तो. त्याचा पार बैल करून टाकला वहीनीनं.
नाही ठेउन घेत. बरोबर कटीतो त्याला.” हे नवनाथचं शबद त्याच्या काळजात खोल चराचरा चरत गेलं.सारा भूतकाळ उचंबळून नरडयात आला त्याचा. नवनाथसाठी त्यानं काय केलं नव्हत?कवा उठून या घरातून पळणं असं झालं होतं त्याला.उठून पळता थोडचं येतं असत?नवनाथ भी इतका प्याला नव्हता. त्यानं भी आपलं नाटकचं केल होतं.माणूस बोलू नाही शकला की असं कृतीतून व्यक्त होतो. नवनाथ तर तुषा-याला काहीचं विचारीना. तो काहीचं विचारणार नाही हे जाल्बाला भी माहीत होतं.
तुषा-या,भऊच्या पाय पडं.पेढं दे.” जाल्बानं बसल्या जाग्यावरनचं बोलला. तुषा-यानं सारचं पेढं काकूकडं दिलं होतं.आत गेला.काकून सांगितलं. सारचं पेढं संपून गेल.
पेढं रात्रीचं संपलं की.दादा
ते संपल असतेल पण हे हायेत की.”जाल्बानं  पेढं काढलं पीशीतलं.तुषा-याच्या हातात दिलं.
पेढं? इतक्या सकाळी? नको ठेव आता मी नंतर खायील.” तुषा-या जाग्यावरचं थिजून गेला.पेढयाची कॅरीबॅग घेऊन तसाच उभा राहीला.
आर,नवनाथ तुषा-याला कुठं टाकावं रं कॉजेलला.कुणी पोरं लातुरला चाललेत.कुणी नगरला.कुणी बीडात.कुणी पटोदयात.काही पोरं सारसगावातचं.”
सारसंगावला भी ज्युनिअर कॉलेज सुरू केल ना?”
केलय की.गेल्यावर्षापासून.”
तुषा-या,मार्क खरेत का रं तुझं?”
आर ,असा का बोलतो? आख्खा तालुका सत्कार कराया लागलं त्याचा.झेडपी मेंबर आमदाराच्या भी हातनं सत्कार झालेत त्याचं.”
दादा, त्या लोकाना करायचं असत राजकारण.त्यांच्य हातानं सत्कार झाला म्हंजी पोरंग हुशार असं नसतं.”
आसल्यात भी आयघालं राजकारण करतेत काय?”
मग?मतासाठी.”
पण सारचं सर म्हणतेत पोरंग लयीचं हूशार.”
आताच्या दहवीच्या मार्कवर काय? आपल्याला काय माहीत नाही कश्या परीक्षा होत्यात.सारसगावचं केंद तर प्रधसदिचं की त्यासाठी.”
सारं सर लोक म्हणतं होतं.जरा भारी कॉलेजात टाका.पोरगा हुशार.”
आर, आता या भारी कॉलेज कुठं असत्यात? कॉलेजमध्ये कुठं पिरीयड तरी होतेत का?सारं क्लासवर चालतं इथ.हरामखोरांनी बाजार करून टाकला सारा.” नवनाथ चिडला होता.कमून चिडला हे जाल्बाला कळतं होतं. वडयाचं तेल वांगयावर. तसं कसं आपून कटू?
क्लासच्य फीस लयं असत्यालं.”
लयं म्हजी. कंबारडं मोडतं फी भरू भ्रूरू.”
इथ बीडात नाही का जमायचं?”
आर, तसल्या फिस भरायला आपल्याला परवडणारेत का?”
परवडत नसलं तरी करावचं लागत.मला काय ते ठावं नाय व्हय? तुझं पैसं भरायचं होतं.आबा गेल्यालं वर्ष भी झालं नव्हतं.सारा कडबा दावणीचं गाय विकून पैसं भरलं की आपून. या नोकरीसाठी तर मळीतली काळी पटटी घातली त्या रावश्याच्या घशात. पैसं तर लागतेतच. आता तर दिवस बदलेत अजून.शिकायचं म्हणल्यावर पैशाकडं बघून जामतं व्हयं?.” जाल्बानं काळजातलं जी सलं होत त्याची टवकाचं काढून बाहेर उपसीली.
आर,तवाच वेगळ होतं.पाच दहा हजारचं काही करतं होतं माणूस.आताची आकडचं लयं मोठाली झालेतं.
मग काय करावं म्हणतोस?”
मला वाटतं बुवा एकंदरीत. त्यानं आयटीआय करावं.वेलडर.मशीनीस्ट.असा कोर्सला नंबर भी लागण.ते सारं पाटोदयातचं  करता येईल.अप डाउन भी करता येईल.तुला माग पुढं त्याची मदत होईल शेतीत.ट्रेड झाला की जॉब लागेल.नाही जॉब लागला तर कुठं भी धंदा करता येईल.लगेचं रांकीला लागलं.”
आमचं रासकर सर म्हणलं होतं. सायन्स घे.डॉक्टर नाय तर इंजिनअर होशील.”तुषा-यानं आपली इचछा सांगितली.
तुषा-या तुला कळतयं का काही? एवढं सोप का ते? हे राहूल पाचवी पासून सीबीएस सी.इंगलीश स्कूलला शिकला.चार वर्ष झालं फी भरतोय.अजून सक्कसेस नाय.त्याचं  भी लाड एवढचं वर्ष.” नवनाथंनं सरळ सल्ला दिला. रंग पाहयाल असतेत का खायला?जाल्बाला सारंच कळून चुकलं होतं. आपल्या भावाच्य डोक्यावर मोठा कुणीतरी डोंगूर ठेवलाय. त्या खाली चेपलाय तेव्हं.
तसं नाही आमचं गणिताचं सानप सर म्हणाले होते.सायन्सं कर.”
सर लोकाला काय फुकटचं सल्ल् दयायचे असतात. शेवटी करायचं असत आपल्याला.तू अजून चार आठ दिवस विचार कर.बापाकडं भी बघ.त्यानं कव्हरं मातीत खपायचं?सात आठ दिवस दिवस लागतेल फर्म सुरू व्हायला आयटीआयचे. फाम्र सुरू झालं की मला फोन कर.पल्ल्वी,चहा नि टीपीन आण बरं मी लेट होतोय. दादा, आता जेऊनच जा.”
नाय,बाबा.नऊच्या गाडीन जातोत. डायरेक्ट फटयावरच उतरलं. रानात लयं काम पडलेत.”
अहो, भावाजी. जेऊन जा.आता करते स्वयंपाक.”
जेवायला तर रानात जाऊ आम्ही.” जाल्बाला सारचं खटकलं होतं. वहीनी भी आपलं तोंडा पुरतच म्हणतं होती.
तुषा-याला भूक लागलं. ना?”
नाय. त्याच्या जेवणासाठी थांबून भागत व्हयं? वडापाव आवडतो त्याला.हाणील दोन वडा पाव.त्याला काय स्टँन्डवर गेलं की.” जाल्बा हासत म्हणाला.नवनाथ उठला की जाल्बा भी उठला.त्याचं माग तुष्या भी.
मग त्यानं सारं ठरील्याव सांग मला.”
काय ठरील्यावर?
तुषा-या नी आयटीआय करायचं ठरील्यावर.”
त्याचं ठरीलं म्या?”
काय ठरीलं.”
तुषार भैय्या, शिकलं तर लातुरलाच शिकलं.
आर,लातुरचा खर्च कसा करणार?,एवढं सोप का ते?”
उचलं घेतो ना.जातो दोन चार वर्षासाठी बेलपूराला.कुणाचं तर खत झाल्या शिवाय मातीत मिसळल्या शिवाय रोपट जोमानं वाढत नसत.कुणाला तरी खत व्हावं लागतं. कुणी पाणी व्हाव लागतं.तुझं नि माझं रक्ताचं नात.तुझ्यासाठी मातीत खपलो.आयुष्याचं खत करून घेतलं.शाळा तर मला भी शिकायची होती की रं.सारचं सा-याच्या नशीबात नसतं.माझं आयुष्यं गेल मातीत. म्हया भैय्याचं माती नाही होऊ दयाचो.”
आर, दादा असा का वेडावाणी करायला लागला. शेतीचं काय होईल आपल्या?”
आपल्या नाही.तुझ्या?तुझ्या शेतीचं काय करायचं तुझं तू ठरवं.बटीन दे कुणाला. संडेला ये वाटणीला वाटणी करून टाकू. तुशार भैय्या चल.गाडी जाईल आपली.तुषा-या लगेच पळत पळत आला.ते फास्टच निघाले होते.तेवढयात भैय्या पळत आला.
तुश्या,तुमची पिशवी.” तुश्यानं पिसी घेतली.जाल्बानं तुषा-याच्या हातातून पिशी घेतली.त्यात मोठाईनं दिलेले पेढं होतं. पिसी मोकळी होती तरी जड जाड झाली होती.नवनाथ. वहीनी,पूजा व राहूल  सारचं स्तब्धपणे उभे राहून पहात होते.              
                                                             परशराम साेंडगे

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...