सोमवार, ५ मार्च, २०१८

युज अॅन्ड थ्रो.

 आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी... तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह. आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं. तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती. बरं कपडे धड नव्हतं त्याची. बेसूर दिसतं होता. पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी. "राम राम सायब..."
"काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"
 "आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"
 "...नाय बुवा.काय झालय?"
 "तेच..ते..इलेक्शनचा राडा."
 "इलेकशनचा राडा...कसला...?"
 "निल्या टाकलायना आत ..."
"आत...निल्या..?"
 "पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?"
"दुसरं काय राजकारणच."
"आर, राजकारणचा तुझा काय सबंध ?"
" कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं ....राज्या माग फिरतं होतं. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी..."
" आत्ता हे राज कोणतं बुवा...?"
 "ते...निखीलराजे कसबे पाटील...पाटल्याचा नातू...प्रतापरावचं पोरगं..?"
 "प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?"
"तेच..ते...लयं बेस्ट गडी...हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं माग त्याच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय."
"मग...?"
 "मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर... त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली. त्यांच झालं राजकारण पण लयं पोरं पिसल्लीत.... पोलसाडचं ती ! त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसत्या आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय."
 "मग ते राज नाय काय सोडीत?"
 " त्यांच्या कडचं आल्लतो.सुटत्यालं म्हणतेतं...पाच सहा दिवसात. सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा".
"मरा की गप्प.."
"निल्याची आय दम खातीयं व्हयं.? ते तर येडचं. हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ? राजकारणात  अशा कुरघोडया....डाव असत्यातचं. तस्स त्याला काय कमी...?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून..."
 "मग काय...सुटलचं ना ...आज उदया...करतेलं जामिन.सारं...मॅनेज करतेलं.सत्ता...पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?."
" त्यांचं काय करायचं....आपल्याकडं काय ?म्या कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली. असली पोरं मेलेलो बरं."
 " असं त्रागा नका करू. सुटलं...होत असतं. समोर चं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी."
 "ते टेलर तसचं म्हणत व्हतं "
 "कस्स?"
 "आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू.... काॅप्रमाईज काय ते झालयं जनू."
 "झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं. "
"कसला इकास अन् बिकास..वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय."
 "असं कसं म्हणतोस...आर ते पक्षच वेगळे."
 "मलात काय भी कळत नाय.टकले यांनी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू "
"मग..निल्या का म्हणतोय आता.?" "ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं."
 "असं म्हणतयं ?मग ....कळतय की नाय? "
 "नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरूआणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय."
 "मग जाऊ दया.... नाय मेळ तर नाय."
 "आता हे झालं माझ...पण निल्याची आय. दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं . मवा निल्या..मवा निल्या .. "
 " काका. आईचं ह्रदय ते. तडफडणाराचं "
 "आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय ? ते एक झालेत म्हणल्यावर....कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं. आपलं नाय शहाणं ...दुस-यावर कशाला टेपूरा." शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.
"येतो ...गाडी लागली आसलं."
            माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही. अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास....तर.आपण पहातोच अहोत की....सत्तेसाठी काय पण... हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं? सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर ....? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं? बरं.हे कुठं ग्राप....पस...जिपला झालं तरी समजू शकतं.पण डायरेक्ट विधानसभेतचं...अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर....लोकशाही चं काय ? आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर... चेल्यांनी...पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड... त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ? निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार? तिनं आपल्या पोराचं आयुष्य...भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं. असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं जॅम टेन्शन आलं बुवा...!
                                      परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
                                          9673400928
                              sahitygandha.blogspot. com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...